अकोला - महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहाला देण्यात आलेल्या टिपू सुलतान (Tipu Sultan Name Politics) या नावावरून आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले आहेत. महापालिकेमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल हे महाविकास मंचमध्ये असताना त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान हे नाव दिले होते. परंतु, सध्या अग्रवाल यांनी या नावाला आता विरोध असल्याची भूमिका घेतल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यावर काँग्रेस आणि शिवसेनेने तोफ डागली आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये टिपू सुलतान नावावरून वादळ उठलेले असताना अकोल्यातही याच कारणावरून राजकीय वादळ उभे झाले आहे. सध्याचे भाजपचे शहराध्यक्ष विजय अग्रवाल महाविकास मंचमध्ये असताना त्यांनी स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास सूचक म्हणून मान्यता दिली होती. आता सध्या ते भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असल्यावर त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान या नावाला विरोध केला आहे. या नावाला विरोध केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर आपला राजकीय रोष व्यक्त केला आहे.
टिपू सुलतान नावावरून अकोला महापालिकेतील राजकारण तापले शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी विजय अग्रवाल यांच्यावर आरोप करीत दुटप्पी राजकारण करीत असल्याचे म्हटले आहे. तर भाजप आणि शिवसेना हे राज्य सरकारमध्ये एकत्र असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर का केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.मनपा स्थायी समितीच्या सभागृहाला शहीद टिपू सुलतान नाव देण्यासाठी मीच प्रस्ताव मांडला होता. देशातील शहिदांचे नाव चांगल्या वास्तूंना दिले जात असेल तर त्यात गैर काय. त्यामुळे या सभागृहाला नाव देताना सध्याचे भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल हे सुचक होते. तर अनुमोदक हे भारिप बहुजन आघाडीचे नगरसेवक गजानन गवई होते.
एकीकडे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष हे टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करीत आहेत. दुसरीकडे अकोला शहरामध्ये भाजपच्या सध्याच्या शहराध्यक्षांनी टिपू सुलतान नावासाठी सूचक दिलेले आहे. त्यामुळे भाजपची भूमिका ही दुटप्पी आहे. भाजपने जर आंदोलन किंवा कोणत्याही विषयावर बोलायचं असेल त्यांनी पक्षाअंतर्गत चर्चा करूनच बोलावे. तसेच या संदर्भामध्ये जर भाजपला काही सुचत नसेल तर त्यांनी अभ्यास करून याबाबत उत्तर द्यावे, अशी टीका काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी केली आहे.अकोला शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी टिपू सुलतान यांच्या नावावरून हे आता राज्यासारखेच वातावरण तापले आहे.
राजकीय वातावरणाचा महापालिकेतील या निवडणुकीमध्ये कोणाला नेमका फायदा होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी टिपू सुलतान या नावाला विरोध केला असला तरी शिवसेनेने मात्र भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनीही भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे.