अकोला - पूर्व वैमनस्यातून तिघांनी तलवारीने वार करून बापलेकाची हत्या केल्याचा प्रकार खरप येथे समोर आलाय. संबंधित घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारात घडली. मात्र, गुन्हा दाखल होण्याआधीच हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. सनातन अभिमन्यु शिरसागर (वय-60) त्यांचा मुलगा विजय सनातन शिरसागर असे मृत बापलेकांचे नाव आहे.
सनातन शिरसागर व त्यांचा मुलगा विजय शिरसागर यांच्या अंगावर आकाश इंगळे, धम्मपाल इंगळे आणि जयपाल इंगळे हे तिघे तलवार आणि लोखंडी पाइप घेऊन धावले. या हल्ल्यात देघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. संबंधित घटनेचा पंचनामा सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. यानंतर आकाश इंगळे, धम्मपाल इंगळे आणि जयपाल इंगळे यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल होण्याआधी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
एलसीबी प्रमुख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, जयंत सोनटक्के, किशोर सोनोने, शक्ति कांबळे, संदीप काटकर, आश्विन मिश्रा, वीरेंद्र लाड, आश्विन शिरसाठ, मोनोज नागमते यांनी संबंधित कारवाई केली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.