अकोला - चेन्नई येथील कुटुंबाला लुटणाऱ्या तिघांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. विष्णू कोकाटे(28), आकाश आठवले(19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यातल्या सहाव्या मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पथक तयार करून अमरदिप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले यांना अटक करून दहा लाखांचा ऐवज जप्त केला. या तिघांना ही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यात आणखी विष्णू कोकाटे, आकाश आठवले या दोघांना अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण-
चेन्नई येथील दिपकराज भीमराज जैन हे मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. त्यांचा नातेवाईक असलेल्या कैलासने अकोल्यातील एक व्यक्ती मॅरेज ब्युरो चालवत असल्याची माहिती त्यांना दिली. तसेच त्याच्याशी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क देखील साधून दिला होता. त्यानुसार दिपकराज जैन, मुलगा दिलीपकुमार जैन, आई, बहीण आणि भाचा हे अकोल्यात आले. त्यांनी येथील व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने या सर्वांना ऑटोमध्ये बसवून विझोरा गावाच्या रस्त्यावर नेले. तिथे आधीच दोन जण दुचाकीवर हजर होते. या तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील त्यांच्याकडील 11 लाख 68 हजारांचा मुद्देमाल लुटून मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला होता.