अकोला - पातुर येथील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेले इतर राज्यांमधील 30 मजूर व काही विद्यार्थी मंगळवारी मध्यरात्री फरार झाले आहेत. ही घटना बुधवारी उघडकीस आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संचारबंदीत अनेक उद्योगधंदे, मोलमजुरीची कामे बंद झाली आहे. शाळा-महाविद्यालय बंद झाल्यामुळे राजस्थान, मुंबई, हैदराबाद, नांदेड भागातील काही मजूर विद्यार्थ्यांना पातुर पोलीस व तहसील प्रशासनाने मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात विलगीकरण केंद्रात ठेवले होते. या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी नगरपालिका कर्मचारी तहसील कर्मचारी तैनात करण्यात आले होते, असे असतानाही 14 एप्रिलला रात्री सांस्कृतिक भवनातून 30 जण पसार झाले.
विलगीकरण केंद्रात ठेवलेले 30 जण पसार झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसीलदार दीपक बाजड, पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, नायब तहसीलदार सय्यद एजसानोद्दीन, मुख्याधिकारी सोनाली यादव, नगर परिषद अध्यक्ष मोहंमद अफसर शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके सुद्धा या ठिकाणी पोहोचल्या व त्यांनी घटनेची माहिती घेतली. या सर्व फरार मजूर, विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना या 30 नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते, त्यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.