अकोला - अकोलेकरांच्या बेफिकीरीमुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 400 च्या वर रुग्ण दररोज निघत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्रिसुत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तरीही रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही, परिणामी जिल्ह्यामध्ये आठ मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. परंतु, या आदेशाला व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.
हेही वाचा - इंधन दरवाढीवरून अकोल्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा नोंदवला निषेध
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये ऑक्टोबर 20 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र रुग्णांचा आलेख कमी होत गेला. दरम्यान, फेब्रुवारी 21 पासून रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. दररोज चारशेच्या वर रुग्ण निघत आहेत. जवळपास चार हजारांवर रुग्ण हे ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर, बरेच रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. या सोबतच कोरोना रुग्णांच्या मृतांमध्ये दररोज एक किंवा दोन मृत्यूने वाढ होत आहे. ही संख्या 370 च्या वर पोहचली आहे. त्यामुळे, प्रशासन अधिकच चिंतीत झाले आहे.
दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठ मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठानांना उघडण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी होत आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांचा संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढतच आहे. प्रशासनाकडून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अकोलेकरांकडून या सूचनांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे चित्र आहे. सोबतच प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरीही कारवाई प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात