अकोला : मूर्तिजापूर पोलिस स्टेशन हद्दीत एका ठिकाणी सून घरी एकटी असल्याची संधी साधत 64 वर्षीय सासर्याने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर 29 वर्षीय दिराने वहिनी घरी एकटी असल्याची संधी साधत त्यानेही तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर पीडिता ही तिच्या माहेरी गेली आणि तिने हा सर्व प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. हा प्रकार ऐकल्यानंतर नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल : त्यानंतर पीडित महिलेने सासरे तसेच दिराच्या विरोधामध्ये मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. मुर्तीजापूर पोलिसांनी यामध्ये सासरा, दीर या दोघांना गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण करीत मूर्तिजापूर पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्यांनतर हे प्रकरण जिल्हा, सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात पोहचले. या प्रकरणामध्ये सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
सासऱ्याला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा : आरोपींवर दोष सिद्ध झाल्यानंतर आरोपी सासऱ्याला भादवि कलम 376, 376 (2) ( के) मध्ये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ( Ten years imprisonment for father in law ) तसेच पाच हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच कलम 506 मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा करावासाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी दिरास वर्ष सक्त मजुरी : आरोपी दिरास कलम 354 अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साध्या करावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यासोबतच कलम 354 (ए) मध्ये एक वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा साध्या करावासाची शिक्षा सुनावली. कलम 506 मध्ये एक वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या करावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी दिरास चांगली वागणुकीच्या हमी बॉण्डवर न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत, ए. पी. गोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास पी. एस. आय. दीपक इंगळे यांनी केला.