अकोला - महापालिकेकडून मोबाईल कंपन्यांचे केबल कापण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील मोबाईल सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे काही नागरिकांनी याविरोधात आज महापालिकेवर मोर्चा काढत त्यांच्याजवळ असलेले मोबाईल फोडून याबाबत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली.
शहरात विविध कंपन्यांनी अवैधरीत्या केबलचे जाळे टाकून महापालिकेला आर्थिक भुर्दंड दिला आहे. ही बाब मनपा आयुक्त जितेंद्र कापडणीस यांच्या लक्षात येताच त्यांनी या कंपन्यांच्या केबलचे जाळे शोधून काढून त्यांच्याकडून कर वसूल करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, कंपन्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे केबल कापण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील दूरध्वनी यंत्रणा विस्कटलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एकमेकांशी संपर्क देखील साधता येत नाही. त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
शासनाची सर्व कामे ऑनलाईन झाले आहेत. मात्र, विस्टलेल्या दूरध्वनी यंत्रणेमुळे इंटरनेट कनेक्शन बंद पडले आहे. त्यामुळे सर्व बँकिंगचे ऑनलाईन व्यवहार ही ठप्प झाले आहे. महानगरपालिकेने मोबाईल कंपन्यांवर कारवाई केल्याने हा संपूर्ण प्रकार घडत आहे. इंटरनेटचा वापर हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासन त्यावर गदा आणू शकत नाही. महानगरपालिका प्रशासन सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे. अकोला महानगरपालिका प्रशासन व मोबाईल कंपन्यांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा व भविष्यांमध्ये असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सेवा पूर्ववत न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाने यावर त्वरीत तोडगा काढून ही सेवा विना विलंब पूर्ववत करावी. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी ही संतप्त अकोलेकरांनी मनपा आयुक्तांना निवेदनातून केली आहे.