अकोला- जिल्ह्यातील तेल्हारा तालुकांतर्गत येत असलेल्या हिवरखेड गावात आज वन विभागामार्फत लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये लक्षावधी रुपयांचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे.
हिवरखेड गावातील बंदुकपुरा भागात अब्दुल बाकीर अब्दुल बाशीर याने त्याच्या घरात अवैधरित्या सागवानची लाकडे साठवून ठेवल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्यचे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वात सदर ठिकाणी धाड टाकण्यात आली. त्यात अब्दुल बाकीर अब्दुल बाशीर याच्या घरातून लाखो रुपयांचा सागवान जप्त करण्यात आला. कारवाईत एक आरा मशीनसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेले सागवान आरोपीने कधी व कुठून आणले याबाबत वनविभाग अधिक तपास करीत आहे. ही कारवाई अकोट वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्यचे वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, वनपाल एस. एस. झोटे, कैलास चौधरी, एस. एस. तायडे, बळीराम सरकटे, मयुर थूटे, नितीन नागरे त्यांच्या सोबतीला हिवरखेड ठाणेदार आशिष लवंगळे, विठ्ठल वाणी, महादेव नेव्हारे आदींनी केली आहे.
हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन