अकोला - स्थलांतरीत मजूरांची त्यांच्या राज्यात परतण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेच. तथापि ज्यांना आपापल्या राज्यात जायचे आहे त्यांच्यापैकी कुणी पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या, पायी जाणारे मजूर दिसले तर त्यांना थांबवून त्यांच्या पुढच्या प्रवासाची सोय करा, असे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद सीईओ डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, सीसीआयचे अजयकुमार आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी जिल्ह्यातील व शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्रांची माहिती घेऊन त्यातील जेथे २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्यास त्या क्षेत्रास प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून वगळा अशी सुचना केली. ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे तेथे संपर्क तपासणी करुन आरोग्य तपासण्या करा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व चाचणी सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली.
जिल्ह्यातून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीय स्थलांतरीत मजूरांच्या प्रवास व्यवस्थेबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यात आली की, अकोला जिल्ह्यातून राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांची संख़्या ३७९ आहे. परप्रांतीय मजूर ४८३१ होते. त्यापैकी आतापर्यंत २२११ जणांना रवाना करण्यात आले असून २६२० जणांच्या जाण्याचे नियोजन सुरू आहे. तर अकोला जिल्ह्यातील लोक जे परप्रांतात अडकले आहेत त्यांची संख़्या १३७१ असून या सर्व जणांना जिल्हा प्रशासनाने त्यांनी मागणी केल्यानुसार ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, जिल्ह्यातून कुणीही मजुरांचे गट पायी जात असतील तर त्यांना थांबवून त्यांची ज्या प्रमाणे विभागस्तरावरुन रेल्वे वा त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत बस सेवेद्वारे जाण्याची व्यवस्था करावी.