अकोला - विविध मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आज (गुरुवार) 'आक्रोश मोर्चा'च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली. मागण्या मान्य करा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी परस्पर शेकडो शेतकऱ्यांचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित झाला. त्यांनी तत्काळ कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना अल्प कर्ज वाटप झाले. अशा शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये वाढीव कर्ज उपलब्ध करून द्यावे, ज्या संस्थेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, त्या संस्थेवर तत्काळ कारवाई करून सेवा सहकारी संस्था बरखास्त करा. तसेच कर्जमाफी योजनेच्या कर्ज वाटपात दिरंगाई होत असून, ही दिरंगाई तातडीने सुलभ करा. बाळापूर आणि तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांचे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या मुग पिकावर अज्ञात रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने त्या शेतीचा पंचनामा तातडीने करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या मागण्या घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश खामकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गोपाल पोहरे, शिवराम वाकडे, गणेश कराळे, सुरज खंडेराव यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता.