अकोला - रेल्वे स्थानकावर एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करीत असल्याच्या संशयावरून सिडब्ल्यूसी सदस्यांनी त्या संशयित तरुणाला अकोला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु, सिडब्ल्यूसी सदस्यांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी संशयितास ताब्यात ठेवले. त्याला कारागृहात ठेवले नाही. दिवसभरापासून पोलिसांसमोर बसलेल्या संशयिताने बुधवारी रात्री पोलिसांना शौचालयास जायायचे आहे, असे सांगून ठाण्यातूनच पळ काढला. संशयित पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
दोन दिवसाआधी रिकाम्या रेल्वे स्थानकावर 30 वर्षीय व्यक्ती आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे दोघे सिडब्ल्यूसी सदस्यांना मिळून आले. या सदस्यांनी त्या दोघांना अकोला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु, सदस्यांनी त्याचवेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या संशयितास अटक केली नाही.
दरम्यान, बुधवारी दिवसभर ठाण्यात पोलिसांच्या नजरेसमोर बसलेल्या संशयिताने रात्री उशिरा ठाण्यात कोणीच कर्मचारी नसल्याचा अंदाज घेतला. त्याने शौचलयास जायचे असे सांगून पोलिस कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकविल्या. त्याने थेट ठाण्यातून पळ काढला. संशयित पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्याचा शोध सुरू केला. तो अद्यापही पोलिसांना मिळून आला नाही. विशेष म्हणजे, संशयित व्यक्ती व अल्पवयीन मुलगी हे दोघेही शेगाव रेल्वे स्थानकावर राहतात. ते दोघेही भीक मागत असल्याचे रेल्वे पोलिस उपअधीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले. संशयित व्यक्ती सुधाकर उईके असल्याचेही त्यांनी सांगितले.