अकोला - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. सर्व खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स आपले दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पण, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्षमतेने होताना दिसत नाही. यावर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खासगी रुग्णालये सुरू ठेवा अन्यथा सेवा अधिग्रहित करण्याच्या पर्यायाचा अवलंब प्रशासन करेल, असा इशारा दिला आहे. ते आज झालेल्या डॉक्टर्सच्या बैठकीत बोलत होते.
बैठकीत सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या. तसेच त्यांनी केलेल्या सूचना व त्यांच्या समस्याही मांडण्यात आल्या. यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरू करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स सुरक्षा द्यावी , प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत समस्या मांडल्या.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, 'खासगी डॉक्टर्सना औषधे, सॅनिटायझर, साहित्य यांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. डॉक्टर्सने आपला दवाखाना उघडणे आवश्यक आहे. काही डॉक्टर्स नावाला दवाखाना उघडून कंपाऊंडरला बसवून आलेल्या रुग्णांना परत पाठवत आहेत, हे अयोग्य आहे. कुठल्याही प्रकारे आलेला पेशंट जर संदिग्ध रुग्ण वाटला तर त्याला वाऱ्यावर न सोडता त्याला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हवाली करणे ही आपली साऱ्यांची सामाजिक, नैतिक जबाबदारी व राष्ट्रीय कर्तव्य आहे.'
डॉक्टर्सने सुचविलेल्या कम्युनिटी दवाखाने या कल्पनेचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ही कल्पना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले. डॉक्टरांच्या अन्य मागण्यांबाबत शासनाच्या निर्देशानुसार कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाचे आपण देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत. अन्यथा प्रशासनाकडे सर्व डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्याचाही पर्याय आहे, असा इशाराही पापळकर यांनी यावेळी दिला.
‘ऑनलाईन’ वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ‘ई-संजिवनी’
आरोग्य विभागाने लोकांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याची सुविधा एका वेबसाईटद्वारे नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप ही प्रचलित आहे. अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर.एस. फारुकी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय दूरसंपर्कसेवेच्या वतीने तसेच www.esanjeevaniopd.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाऊन लोकांना वैद्यकीय सल्ला घेता येणे शक्य होणार आहे. सध्या लॉकडाऊन व सामाजिक अतंर ठेवणे आवश्यक असल्याने या वेबसाईटव्दारे घर बसल्या उपचाराची विनामूल्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये सबंधित रुग्णाला वेबसाईट वर मोबाईल क्रमांकाव्दारे ओ.टी.पी. प्राप्त करुन उपचार बाबत वैद्यकीय तज्ज्ञांव्दारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
हेही वाचा - संचारबंदीमुळे रस्त्याचे काम होते बंद; ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती करुन मिळवली परवानगी
हेही वाचा - पोलीस ठाणे बनले वाहनतळ; संचारबंदीच्या काळात कारवाई