अकोला - अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगले भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांनी साठवून ठेवलेली सोयाबीनची बिजवाई विक्रीस काढली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. सध्या सोयाबीनचे भाव 4200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर या सोयाबीनचा हमीभाव 3800 रुपये आहे. त्यामुळे जे शेतकरी बिजवाई विक्रीस आणत आहेत त्यांना फायदा होत आहे.
भाव नसल्याने साठवून ठेवले होते सोयाबीन -
अकोला जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन अतिवृष्टीमुळे खराब झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हवा तसा भाव मिळाला नाही. 2800 ते 3000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेले. अनेकांनी सोयाबीन खराब झाल्यामुळे त्यावर ट्रॅक्टर फिरवला. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास परवडत नसल्यामुळे ते तसेच शेतात पडून ठेवले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चांगले राहिले, त्यांनी ते घरी साठवून ठेवले. सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहेत.
बाजार समितीत आवक वाढली -
3800 रुपये हा सोयाबीनला हमीभाव मिळाला आहे. परंतु अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या सोयाबीनला 4200 ते 4400 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बिजवाईसाठी ठेवलेले सोयाबीन विक्रीस काढले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीन विकल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली मागणी -
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढत असल्याने हे भाव साडेपाच हजार रुपयांपर्यंतही जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आणखीन भाववाढीची वाट पाहत आहे.
हेही वाचा - भारतीय खेळाडूंना क्वारंटाइन करणार नाही! महापालिकेने सांगितले कारण