अकोला - राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वच शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर 17 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील विविध कोरोना तपासणी केंद्रांवर शिक्षकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांनी केंद्रांवर गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांमध्ये जवळपास चार हजार शिक्षक असून, दोन हजार शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तपासणी करण्याआधी मुख्याध्यापक व त्यानंतर विषय शिक्षकांनी आधी कोरोना तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नियोजन न झाल्यामुळे सर्वच शिक्षकांनी कोरोना तपासणी केंद्रांवर गर्दी केली आहे. या गर्दीमुळे तपासणी केंद्रांवर गोंधळ उडाला असून तपासणी करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, तपासणीला वेळ लागत आहे.
22 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांची कोरोना तपासणी चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून, तसेच जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी घेण्यात येत नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
आधी नोंदणी नंतर तपासणी
शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याआधी त्यांची सकाळी 10 ते 12पर्यंत नोंदणी करण्यात येत आहे. 12नंतर तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी जिल्ह्यातील विविध तपासणी केंद्रांवर होत आहे.
हेही वाचा - वीज बिलात सवलत नाही, महाआघाडी सरकारविरुद्ध वंचितचे विश्वासघात आंदोलन