अकोला - खडकी येथील शासकीय जागृती महिला राज्यगृहातून सहा मुली साडीच्या सहाय्याने पळून गेल्याची घटना आज (16 ऑक्टोंबर) उघडकीस आली आहे. याप्रकरणी राज्यगृहाच्या काळजीवाहक आर. आर. गोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खडकी येथील शासकीय जागृती महिला राज्यगृहात 35 मुली राहतात. त्यापैकी सहा मुली राज्यगृहातून पळाल्या आहेत. या मुली सज्ञान आहेत. इमारतीच्या छतावरील ग्रीलला साडी बांधून त्याद्वारे या मुली खाली उतरल्या. या प्रकाराबाबत काळजीवाहक आर. आर. गोटे यांना माहीती मिळताच त्यांनी याबाबत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या पोलिसांनी याप्रकरणी सहा मुली हरविल्याची नोंद केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराबाबत अनेक तर्क लावण्यात येत आहे मात्र असे असले तरी तपासानंतरच या प्रकाराचे सत्य समोर येणार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत आहे.