अकोला- १ हजार ८६ स्थलांतरीत मजूर विशेष रेल्वेगाडीने जबलपूरकडे रवाना झाले. गुरुवारी रात्री आठ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदिल दाखवून ही गाडी रवाना केली.
हेही वाचा- मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अमरावती येथील उपायुक्त प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अकोला मो.यस्मिन अन्सारी आदी उपस्थित होते.
विशेष श्रमिक एक्सप्रेस (गाडी न. ०१९२०) ने हे मजूर रवाना झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील १६०, अमरावती ३३६,वाशिम ४४, बुलडाणा २४३ व यवतमाळ येथील ३०३ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना प्रशासनातर्फे जेवण, पाणी पुरविण्यात आले.
आज (शुक्रवारी) अकोला ते भोपाल या मार्गाने दुसरी श्रमिक रेल्वे जाणार असून ही गाडी अकोला येथून रात्री साडेआठ वाजता रवाना होणार आहे. या गाडीतही अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथील परप्रांतिय श्रमिकांचा समावेश असेल, असे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी माहिती दिली.