अकोला - शहरातील घरकुल बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मनपावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शाहिरांना सोबत घेऊन गाणे गाऊन हा मोर्चा मनपावर नेण्यात आला. घरकुल बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्ताकडे केली आहे.
अकोला महापालिकेने घरकुल बांधकामासाठी घेतलेले लक्षांक मागील ३-४ वर्षात पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत फक्त काहीच घरकुल बांधकाम पूर्ण झालेले आहे. तर इतर बांधकामांना मंजुरी न मिळाल्यामुळे सर्व बांधकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे थांबलेले घरकुलांची कामे तत्काळ पूर्ण करून ती बांधकामासाठी मंजूर करावेत, या मागणीसाठी शिवसेनेचे मनपातील गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक घरकुल लाभार्थी सहभागी झाले होते. यावेळी लोकशाहीरांना सोबत घेऊन महापालिकेच्या प्रशासनाविरोधात तयार केलेले गाणे गाऊन मनपाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी मनपा आयुक्त कक्षासमोर ठिय्या मांडला. यावेळी सिटी कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त होता. जोपर्यंत ही बांधकामाची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत कार्यालयापासून जाणार नाही, असा निर्धार मोर्चेकरी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला. आज ही प्रकरणे मंजूर झाले नाही तर भविष्यात शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा शेळके यांनी दिला.