अकोला - पुरवठा विभागात जीर्ण, गहाळ शिधापत्रिका बदलून देण्यासाठी विभागातील अधिकारी, कर्मचारी पैशाची मागणी करीत आहे. या प्रकरणाचा शिवसेनेने पुरवठा विभागात जाऊन पर्दाफाश केला. थेट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाच याचा जाब विचारला. त्यानंतर शिवसेनेचा रोष पाहता पुरवठा अधिकारी काळे यांनी 17 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा निपटारा करतो, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
जीर्ण, गहाळ झालेल्या शिधापत्रकधारकांना दुय्यम कार्ड बनवून देण्याच्या कार्याला पुरवठा विभागातील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आज शिवसेना शहरप्रमुख अतुल पवनीकर यांच्या नेतृत्वात पुरवठा अधिकारी काळे यांना जाब विचारण्यात आला. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी किती पैसे खातात याचा पुराव्यासहित पर्दाफाश केला. यामध्ये आपली ‘मूक संमती’ आहे काय, याचा जबाब मागितला असता, त्यांनी प्रकरणाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी शिवसैनिकांची आक्रमकता पाहता लेखी हमीपत्र देवून १७ ऑगस्टला दुय्यम शिधापत्रिका देतो असे पत्र शिवसैनिकांना दिले. यावेळी उपशहरप्रमुख गजानन बोरले, योगेश अग्रवाल, विशाल कपले, राजू वगारे, नंदु ढाकरे, महिला उपजिल्हा संघटिका निलीमा तिजारे, सुनीता श्रीवास यांच्यासह शिधापत्रिकाधारक व शिवसैनिक उपस्थित होते.