अकोला - पाच वर्षांपासून केळकर सन्मित्र मानस व व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेला अविनाश लोखंडे हा मानसिक रुग्ण कोरोनाग्रस्त होऊन कोविड रुग्णालयात दाखल केल्यापासून बेपत्ता आहे. या प्रकरणी घातपात झाल्यागत परिस्थिती दिसत असताना केवळ 'हरवला आहे' एवढ्या नोंदीवर त्याचा तपास लागणार नाही. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून घातपाताचा तपास करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज केली आहे.
शिवराय कुळकर्णी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीधर यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी केवळ हरवला आहे, अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. हे प्रकरण घातपाताचे असून तात्काळ त्या दिशेने तपास सुरू करावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

अविनाश बेपत्ता होण्यासाठी प्रथम डॉ. दीपक केळकर जबाबदार असून त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिकारात येणाऱ्या रुग्णवाहिका कक्षाने देखील संशयास्पद कामगिरी केली आहे. हे सर्व संबंधित अविनाशच्या घातपातासाठी कारणीभूत असल्याचे आमचे ठाम म्हणणे आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अविनाश 24 दिवसांपासून गायब आहे. त्याचा युद्धस्तरावर तपास करण्यात यावा. अतिशय बेजबाबदार वर्तन करणाऱ्या संबंधितांना पोलिसांनी पाठीशी घालू नये, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.
हेही वाचा - लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव विरोधकांनी हाणून पाडला - देवेंद्र फडणवीस