अकोला - स्वतंत्र भारत पक्ष आणि सुवर्ण भारत पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन लोकसभेसाठी शेतकरी संघटना ४० उमेदवार राज्यात उभे करणार आहे. स्वतंत्र भारतात विचार मांडणाऱ्यांना उमेदवारी देणार असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट पत्रकार परिषदेत म्हणाले. विदर्भातील १० पैकी ६ उमेदवार जाहीर केले असून ४ उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी समाज सभागृहात झाली. त्यावेळी ते अकोला येथे आले असता बोलत होते. पुढे ते म्हणाले, स्वतंत्रवादी पक्ष आणि विदर्भ महानिर्माणचे १० उमेदवार विदर्भात उभे करणार आहे. त्यापैकी ६ जाहीर केले, तर ४ उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील.
शेतकरी हिताच्या फक्त गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, सत्य परिस्थितीत त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही. भाजप आणि काँग्रेसने हेच केले आहे. त्यामुळे आम्ही या पक्षांना पाठिंबा जाहीर करणार नाही. उलटपक्षी या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. राज्यात ४० उमेदवार रिंगणात राहणार आहेत. त्यामध्ये विदर्भातील १० जागा लढणार असल्याचे ते म्हणाले.
आमची विचारांची लढाई आहे. स्वतंत्र भारतात विचार मांडणारे उमेदवार आमचे राहणार असून, स्वतंत्र विचारांचे मतदार राहणार आहेत. आमच्या उमेदवारांकडे पैसे नाहीत. मात्र, स्वतंत्र विचार असल्याने जिंकून येऊ, असा आत्मविश्वास घनवट यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार चटप यांच्यासह आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते.