अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातल्या पोही गावच्या सरपंचाने सोमवारी पंचायत समितीत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. किशोर नाईक असे या सरपंचाचे नाव आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील, गावाचा विकास आराखाडा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी विस्तार अधिकारी बी. पी. पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आपण आत्मदहन करत असल्याचे या सरपंचाने म्हटले आहे.
पोहा गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन रोहणा बॅरेज प्रकल्पात गेली आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. विस्तार अधिकारी पजई हे पुनर्वसनाचा प्रश्न पुढे करून, गावाचा विकास कृती आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यास टाळाटाळ करत आहेत. असा आरोप नाईक यांनी केला आहे. अशाही परिस्थितीमध्ये गावातील अत्यावश्यक विकास कामे थांबवता येणार नसल्याचे महसूल आणि वनविभागाने नमूद केले आहे. तरी सुद्धा गावाचे नाव विकास कृती आराखड्यातून वगळण्यात आल्याचही नाईक यांनी म्हटले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार विनंती
गावाचा विकास आराखडा मंजूर व्हावा, यासाठी सरपंच किशोर नाईक यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी, व विस्तार अधिकारी पजई यांना वारंवार विनंती केली. मात्र तरी देखील वेगवेगळी कारणे सांगून विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येत नाही. तसेच विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांची मागणी करण्यात आली. ते सर्व कागदपत्रे सादर करून देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही. सर्व उपाय करून देखील परवानगी मिळत नसल्याने अखेर सरपंच किशोर नाईक यांनी पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गावावर अन्याय होणार नाही - गटविकास अधिकारी
सबंधित गावाच्या प्रश्नासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांनी दिलेल्या मार्गर्दशनानुसार पुढील कारवाई होईल आणि तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल. गावावर अन्याय होणार नाही. मी दोन दिवसांपूर्वीच रुजू झालो आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कारवाई करू, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस यांनी दिली.