अकोला - अमरावती शहरात भरदिवसा एका मुलीचा गळा चिरून खून करण्यात येतो. अवघ्या ६ महिन्यात अशा प्रकारच्या ४ घटना अमरावतीत होतात. अमरावतीमधील मुली व महिला या दहशतीच्या वातावरणात जगत आहे. सरकारने या घटनेकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री हे धृतराष्ट्र झालेत का, असा आरोप राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सनगर यांनी केला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संपर्क अभियानसंदर्भात त्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पुढे त्या म्हणाल्या, अमरावतीमध्ये अत्याचार झालेला त्यांना दिसत नाही आहे का ? विशेष म्हणजे पोलीस विभाग या घटनेबाबत मूग गिळून बसल्याचा आरोप त्यांनी केला.
अकोल्यातील दौऱ्यात त्यांनी अमरावती येथील मोर्शी तालुक्यामधील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी तेथील एकही मुलगी बोलण्यास समोर आली नाही. काही मुलींनी खासगीत अमरावतीमध्ये घडलेल्या घटनांनंतर अमरावतीतील महिला व मुलींच्या स्थितीची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले.
सही येत नाही आणि मेट्रो ट्रेन आणतात. एखादी मेट्रो कमी आली तरी चालेल पण महिला व मुलींची सुरक्षितता यावर भर देणे सरकारची जबाबदारी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तरी याची दखल घेतली का, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आशा मिरगे, राजकुमार मूलचंदानी, श्रीकांत पिसे आदी उपस्थित होते.