अकोला - राजनाथसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली असून राजनाथसिंह यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे. तर अभ्यासपूर्ण व्यक्तव्य न करता अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार करणाऱ्या राजनाथसिंह यांना महाराष्ट्रात येताना विचार करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातीला शिवप्रेमी जनता भाजपाची कबर खोदल्याशिवाय राहणार नाही, असा दम शिवव्याख्याते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथसिंह यांना दिला आहे.
अमोल मिटकरींची आक्रमक प्रतिक्रिया -
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या बैठकीसंदर्भात ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पालकमंत्री बच्चू कडू आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. 'राजनाथसिंह हे जरी देशाचे संरक्षण मंत्री असले, तरी फ्रान्सला राफेल खरेदी करताना भारताचे कसे दिवाळे काढले. हे अख्या जगाने पाहिले आहे. राजनाथसिंह यांनी केलेल्या व्यक्तव हे अकलेचे दिवाळे काढणारे आहे. मी राजनाथसिंह यांना सांगू इच्छितो की, भाजपा अख्या महाराष्ट्रात बदनाम होतेच आहे. राहिलेली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांवर बोलताना थोडा अभ्यास करून बोलावे, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपाची कबर खोदेल आणि तुम्हाला सुध्दा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल, अशी आक्रमक प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू -
तर पालकमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात बोलताना सावध भूमिका घेतली आहे. राजनाथसिंह यांनी केलेले व्यक्तव्य हे अभ्यासपूर्ण नाही आहे. त्यांनी अभ्यासपूर्ण बोलणे आवश्यक होते. अशाप्रकारेचे व्यक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे. अशाप्रकारे व्यक्तव्य करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते राजनाथ सिंह? -
काल टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मैदानाचे आज (शुक्रवार) नामकरण करण्यात आले. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले, असे वक्तव्य राजनाथसिंह यांनी केले होते.