अकोला - जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यूदर कमी व्हावा, यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिगंभीर कोरोना रुग्णांसाठी प्राणरक्षक रेमेडेसीवीर इंजेक्शनचे २५ डोस पाठविले आहेत. हे इंजेक्शन आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचा दरही वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. सरकारच्या नियमानुसार कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमेडेसीवीर इंजेक्शनचा वापर करता येतो. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्याकरीता या इंजेक्शनचा वापर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत केले आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी घोरपडे उपस्थित होते. ‘’
रेमेडेसीवीरचे संशोधनातून दिसून आलेत चांगले परिणाम
गिलियड सायन्सेसच्या तपासणी पथकाच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये कोविड-१९ रूग्णांना रेमेडेसीवीर औषधाचा फायदा होतो, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) यापूर्वी म्हटले.सखोल पुनरावलोकन केलेला डेटा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तपासणी करण्यात आलेल्या, अमेरिकन 'फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन'कडून तातडीच्या स्वरूपात परवानगी मिळालेल्या रेमडिसिव्हिर औषधाने कोविड-१९ रूग्णांच्या बरे होण्याचा कालावधी ४ दिवसांनी कमी झाला आहे. त्यामुळे या रुग्णांना ११ दिवसात घरी जाता आले.