अकोला - गेल्या अनेक वर्षापासून जनता भाजी बाजार हा सुरू आहे. परंतु, महापालिकेने हा भाजीबाजार आता बंद केला आहे. मनपातील या कटकारस्थानामुळे हा जनता भाजी बाजार बड्या व्यापाऱ्यांना विकण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा विकण्याचा बिझनेस महापालिका करीत आहे का? असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांवर आज केला. जनता भाजी बाजार येथील व्यापार्यांसोबत ते बोलत होते.
जनता भाजी बाजाराच्या जागेवर अनेकांचा डोळा-
माजी नगराध्यक्ष विनय कुमार पराशर यांनी नगरपालिका असताना भाजी विक्रेत्यांसाठी हा जनता बाजार उभा केला होता. परंतु, महापालिका स्थापन झाल्यानंतर या जनता भाजी बाजाराच्या जागेवर अनेकांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे येथील भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांना मनपाकडून त्रास दिला जात आहे. सत्ताधारी ही जागा एका बड्या व्यापाऱ्यांना विकण्याच्या प्रयत्नात आहे. परंतू, हा प्रकार वंचित बहुजन आघाडी कदापि होऊ देणार नाही आहे. वंचित बहुजन आघाडी या व्यापाऱ्यांसोबत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यासोबत बैठक घेतली. मनपा प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महापालिकेतील सत्ताधारी हे व्यापार्यांच्या विरोधात आहेत का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, मनोहर पंजवानी, गजानन दांडगे, जिल्हा परिषदेचे कृषी आणि समाज कल्याण सभापती व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- नाशिक येथे कारमध्ये ऑक्सिजन पुरवल्याने कोरोना रुग्णाचे वाचले प्राण