अकोला - अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधी असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याचवेळी त्यांनी महेश विष्णुपंत डावरे या उमेदवारास वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केल्याचे जाहीर केले.
येत्या एक डिसेंबर रोजी राज्यभरात पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडत आहे. त्यामध्ये अमरावती विभागातून जवळपास 22 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्यापरीने शिक्षकांना स्वत:कडे वळवण्यासाठी जोर लावत आहे. यामध्ये शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे, विज्युकटाचे अविनाश बोर्डे, सरनाईक, हिंगे यांच्यासह आदींनी या निवडणुकीत उमेदवारी घेतली आहे.
अनेक शिक्षक संघटनांनी आपले उमेदवार उभे केले असले, तरीही महेश विष्णुपंत डावरे या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता आणखी रंग भरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणवादी, समतावादी, मानवतावादी, लोकशाहीवादी मतदारांना 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.
'वंचित'तच उभे करणार होते उमेदवार
अमरावती शिक्षक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करण्याच्या तयारीत होती. त्यासाठी त्यांनी बैठकही घेतली होती. परंतु, शेवटच्या क्षणी त्यांनी महेश डावरे यांना पाठिंबा जाहीर केला.