अकोला - राजकारणात सध्या नवीन फंडा येऊ पाहात आहे. भाजप व आरएसएसकडून विरोधकांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. ब्लॅकमेलिंग च्या माध्यमातून भाजपाला आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, की केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी गांधी कुटुंबीय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. भाजप गत ५ वर्षांपासून केंद्रात सत्तेत असताना गांधी कुटुंबांवर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा प्रश्न निर्माण होतो. या आरोपात तथ्य असेल तर गांधी कुटुंबीय तुरुंगात हवे होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गांधी कुटुंबांवर आरोप करून भाजप व आरएसएस दबावतंत्राचा अवलंब करत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, की १९९० पासून आम्ही राजकारणातले अनुभव घेतले आहेत. अनेक नेत्यांवर बेछूट आरोप झाले. काही त्याचे बळी गेले. तर काहीजण अद्यापही ठामपणे उभे आहेत. काँग्रेसची देशात कुठेही आघाडी होताना दिसत नाही. बीजेपी व आरएसएसच्या दबावातूनच हे सगळे घडत असून ब्लॅकमेलिंगचे राजकारण धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शरद पवार, विखे पाटील यांचे चिरंजीव, रणजितसिंह मोहिते पाटील यांची उदाहरणे हा भाजपच्या दबावतंत्राचा एक भाग आहे. नागपूर येथून काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी देऊन गडकरी विरोधात डमी उमेदवार उभा केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी राज्यात जून २०१८ पासून अस्तित्वात आली आहे. आगामी काळात भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीमध्ये विलीन केला जाईल, असेही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.