अकोला - मलकापूर येथील सनसीटी जवळच्या खुल्या मैदानात मांडूळ जातीचा (दोन तोंड्या) साप आज दुपारी वावरत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसला. त्यांनी याची माहिती खदान पोलिसांना दिली असता पोलिसांनी हा साप ताब्यात घेऊन तो वनविभागाच्या स्वाधीन केला. या मांडूळ जातीच्या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. तसेच हा साप गुप्त धन शोधून देतात, असेही अंधश्रद्धा आहे.
सापाला पकडून केले वनविभागाच्या स्वाधीन -
सनसिटी जवळील खुल्या मैदानात दुपारी मांडूळ जातीचा साप वावरत होता. याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना तो दिसला. त्यांनी लगेच याची माहिती खदान पोलिसांना दिली. हा साप पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी सदाशिव मार्गे, राजेश वानखडे, धीरज वानखडे, कपिल राठोड हे घटनास्थळी आले. त्यांनी हा साप ताब्यात घेतला. त्यानंतर तो साप हा वनविभागातील मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्याकडे सुपूर्द केला.
धन शोधून देणारा मांडूळ साप -
गुप्त धन शोधून देण्यासाठी हा साप उपयोगात येतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे हा साप शोधण्यासाठी अनेक अंधश्रद्धाळू हे जंगलात फिरत असतात. या सापाची मोठी मागणी आहे. तसेच गुप्त धन शोधून देण्यासाठी उपयोगात असलेला मांडूळ साप हा पकडल्यानंतर त्याची तस्करी केल्या जाते. हा साप काळ्या बाजारात लाखो किंवा करोडोमध्ये विकल्या जातो. मांडूळ साप तस्करीप्रकरणी पोलीस विभागाने अनेकवेळा कारवाई केली आहे.
हेही वाचा - VIDEO : व्हॅनचालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेली दुचाकी