अकोला – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील बैदपुरा येथे कोरोना संक्रमीत आढळल्याने कोरोना कोअर झोन व बफर झोन म्हणून सील करण्यात आला होता. तसेच आज सकाळी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझेटीव्ह आला असल्याने शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये एकाने वाढ झाली असून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व मनपा वैद्यकीय चमू व क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत संपूर्ण भागाची पाहणी केली.
यावेळी नागरिकांना आपल्या जवळपास सर्दी, खोकला किंवा ताप असलेले रूग्ण असतील त्यांची माहिती कंटेन्मेंट भागामध्ये सर्व्हे करण्याकरिता आलेल्या चमुंना देऊन कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी मदत करावी व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जातांना तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधुन सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, अशी विनंती केली आहे. तसेच त्या भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची (किराणा, भाजीपाला व दूध) यांची व्यवस्था आतच करण्यात आली असून कंटेन्मेंट झोन मधला कोणताही नागरिक त्या भागातून बाहेर जाणार नाही व बाहेरील कोणतेही व्यक्ती कंटेन्मेंट झोन मध्ये जाणार नाही, याबाबतच्या सूचना मनपा आयुक्त यांनी तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांना दिल्या आहेत.