अकोला - शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी साडेचार वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जेल चौक ते रेल्वे स्टेशन चौकापर्यत नियोजित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन केले होते. मात्र, त्यांच्या प्रत्यक्षात कामाची सुरूवात एक महिन्यापासून झाली आहे. सद्य स्थितीत सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2015 मध्ये अकोल्यातील एका कार्यक्रमात जेल चौक ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर या कामाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत विरोधकही आक्रमक झाले होते. मात्र, आता या कामाची प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कामामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या दूर होणार आहे. जरी असे असले तरी हा पूल लवकर होणे अपेक्षित आहे. सद्य स्थितीत मार्गात बदल केल्याने, पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे.