अकोला - जिल्ह्यात नवे 20 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 48 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 879 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 512 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 273 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
रविवारी सकाळी प्राप्त अहवालात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 8 महिला व 12 पुरुष आहेत. त्यातील 13 जण अकोट येथील असून 2 जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
एका खाजगी रुग्णालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे. तर अकोट येथील 60 वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला 25 जूनला रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 4, कोविड केअर सेंटरमधून 30, आयकॉन हॉस्पिटलमधून 5, ओझोन हॉस्पिटलमधून 4 व हॉटेल रिजेन्सी येथून 5 अशा 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.