अकोला - महानगरपालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष सहाय्य योजना राबवण्यात येते. यासाठी आवश्यक निधीत 14 व्या वित्त आयोगातून रक्कम वळती करण्याची तरतूद आहे. तसेच देयके अदा करण्यास कार्योत्तर मंजुरी मिळवावी लागते. संबंधित मंजुरी प्रदान करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला.
प्रभागांमध्ये आवश्यक नाला बांधकामसाठी निधी देण्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर बसून गदारोळ केला.
महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चना मसणे होत्या. यावेळी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांसह भाजपचे नगरसेवक देखील समोरासमोर आले. या गोंधळात महापौरांनी संबंधित विषय मंजूर केल्यावर सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच बाचाबाची झाली.
याच गोंधळात महापौरांनी इतरही विषय वाचण्याचे आदेश सचिव अनिल बिडवे यांना दिले. विषय वाचल्यानंतर ते मंजूर झाल्याचे महापौरांनी सांगितले. शिवसेना गटनेता राजेश मिश्रा व काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांनी या विषयावर चर्चा करून आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी रेटून धरली. त्यानंतर महापौर अर्चना मसणेंनी या विषयावर चर्चा करण्यास मंजुरी दिल्यानंतर प्रकरण शांत झाले. मात्र, त्यानंतर देखील एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले.
तत्पूर्वी काँग्रेसचे नगरसेवक नौशाद यांनी त्यांच्या प्रभागात झालेल्या व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सिंग ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महापौर अर्चना मसणे व आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे केली. त्यावरून सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला.