अकोला - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा उभा करण्यासाठी अकोला दौऱ्यावर आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. मराठ्यांचे नेते मराठा आरक्षण (maratha reservation) मिळवून देण्यात कमी पडले आहेत. कारण ते राजकारणात गेले असल्याने हे आरक्षण मिळू शकले नाही, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
'मुख्यमंत्री किती जणांना भेटतात?'
ते म्हणाले, की 2016ची घटना झाल्यानंतर मराठ्यांना भाजपानेच आरक्षण दिले. आता महाविकास आघाडी सत्तेत आहे. यामध्ये शिवसेनेसोबत दोन पक्ष सोबत आहेत, ज्यांनी कधीच मराठ्यांच्या हिताचे काम केले नाही, असा टोला त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला. नेत्यांपेक्षा राज्यकर्त्यांची, मुख्यमंत्र्यांची इच्छा असणे गरजेचे आहे आणि ते आम्हाला या सरकारमध्ये दिसले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उच्च न्यायालयात जे युक्तिवाद झालेले आहेत, ते राज्यावरती झालेले आहेत. उच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण होते तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वकील एकत्र बसायचे. कोणत्या वेळेला कोणती कागदपत्रे जोडायची, कोणता युक्तिवाद करायचा यासाठी एक समन्वय समिती होती. तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती होती की मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. जे युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात झाले, तसेच युक्तिवाद हे उच्च न्यायालयात झाले. आजचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे किती जणांना भेटतात. त्यामुळे त्यांची इच्छाशक्ती हे मराठ्यांच्या बाजूने नाही आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून दिसते, असा आरोपही नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
हेही वाचा-गंगेच्या पात्रात शव वाहण्याचे पाप मोदी सरकारचेच, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्ला बोल