अकोला - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा निवडणुकीतील उमेदवार हिदायत पटेल यांच्या उमेदवारीला मुस्लिम समाजातील नागरिकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक दर्शवून निषेध केला. त्यांना या निवडणुकीतून बाहेर पडण्याच्या सूचनांचे फलक नागरिकांच्या हातात होते. या प्रकारामुळे काँग्रेसचा मुस्लिम मतदार दूर जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अकोला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, ऐनवेळी काँग्रेसने हिदायत पटेल यांचे नाव वेळेवर जाहीर करून मुस्लिम समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिल्याचे दर्शविले. वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजाची घट्ट मुठ बांधून ठेवलेली आहे. त्यामुळे मुस्लिम समाज या निवडणुकीत काँग्रेस एवजी वंचित बहुजन आघाडी सोबत जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काँग्रेसने हिदायात पटेल यांचा भाजपला निवडून देण्यासाठी उपयोग केला असल्याची चर्चा मुस्लिम समाजामध्ये आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजप विरोधात मुस्लिम उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मागच्या निवडणुकीत त्यांना मालेगाव आणि रिसोड येथे विरोध झाला होता. परंतु, यावर्षी त्यांना अकोल्यातही सुरुवातिलाच विरोध झाला आहे.
यामुळे त्यांना विरोध करण्यात येत असून काँग्रेस मुस्लिम समाजाला बाहुले म्हणून वापरत असल्याचा आरोप होत आहे. याचा विरोध करण्यासाठी शेकडो मुस्लिम नागरिकांनी फलक हातात घेऊन काँग्रेसचा विजय न करता भाजपचा विजय करत आहात, त्यामुळे ही लोकसभा निवडणूक लढवू नका अशा प्रकारच्या सूचना या फलकांवर होत्या. मुस्लिम नागरिकांनी याबाबत कुठलीही नारेबाजी न करता शांतपणे हे फलक दर्शवले.