अकोला - शासनाच्या सावकारी कर्जमाफीच्या योजनेमार्फत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सावकाराकडे तारण असलेले सोने शेतकऱ्यांना परत दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 शेतकऱ्यांना सोने परत देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचे प्रमाणपत्रही दिले जात आहे. जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांचे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सावकारी कर्जापोटी 15 कोटी रुपयात गहाण ठेवलेले आहे.
सततची नापिकी आणि उत्पादनापेक्षा खर्च जास्त होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून उत्पन्न मिळत नव्हते. जेमतेम मिळालेल्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले होते. त्यात उत्पन्न मिळावे म्हणून तो मेहनत करत असतो. त्यामुळे शेतीच्या लागवडीसाठी घरातील सोने सावकाराकडे गहाण ठेवून त्या मोबदल्यात शेतीसाठी कर्ज घेतात. त्या पैशातून शेती करून आलेल्या उत्पन्नातून तारण असलेले सोने सावकाराकडून परत घेता येत नव्हते. सोन्यावरील व्याज आणि मूळ रक्कम शेतकरी पीक विकल्यावरही ती शेतीच्या उत्पनातून जमवू शकत नव्हता. शेवटी ते सोने सावकाराकडेच राहत होते. त्यावर व्याजही वाढत होते. शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर 2014 पूर्वी सावकाराकडे तारण ठेवलेले सोने होते. अशा शेतकऱ्यांचे सोने परत मिळावे, यासाठी शासनाने सावकारी कर्जमाफी योजना काढली. या योजनेतील शेतकऱ्यांना त्यांचे सावकाराकडील सोने जिल्हा उपनिबंधक विभागातर्फे परत दिले जात आहे. आतापर्यंत 60 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून अजूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
हे वाचलं का? - मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी?
जिल्ह्यातील 9 हजार शेतकऱ्यांचे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सावकारी कर्जापोटी 15 कोटी रुपयात गहाण ठेवलेले आहे. हे सोने जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी परत करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.