अकोला - शेतकरी या देशामध्ये बळीराजा व अन्नदाता म्हणून ओळखला जातो. पालनकर्ता म्हणून कार्यरत असताना त्याच्या समस्यांसाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तिघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाणूनबुजून दुर्लक्ष करून राजकारण करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारला आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यातील सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या संचारबंदी, टाळेबंदीमुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. खरीप पीक कर्ज वितरणात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. कपाशी, तूर, सोयाबीन इत्यादी पीक उत्पादनाची विक्री करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कपाशी व अन्य उत्पादनाचे चुकारे शासनाकडून प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांच्या या अस्मानी व सुलतानी संकटाचे आपण सर्व साक्षीदार आहोत, अशा प्रसंगात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याचे पैसे मिळण्याकरिता संघर्ष करावा लागतो, पोलिसात गुन्हे दाखल करण्यासाठी धाव घ्यावी लागते, न्यायासाठी उपोषण करावे लागते याबाबी सुसंस्कृत व पुरोगामी म्हणवणाऱ्या आघाडी सरकारसाठी अशोभनीय आहे. ही बाब प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्षात घ्यावी, असे संवेदनशीलपणे निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांनी हक्काच्या न्यायासाठी आपला जीव धोक्यात घालून उपोषण करू नये, त्यांना संघर्ष करावा लागू नये, या जनतेप्रती असलेले उत्तरदायित्व लक्षात घेता, भविष्यात जनतेला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने संघर्ष करण्याची जबाबदारी निश्चितच आपली असल्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.