अकोला : गेल्या चार दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जोरदार वारा गारपीट आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्री जोरदार वारा आणि विजांच्या कडकडामुळे पारस येथील बाबा महाराज संस्थानमध्ये असलेल्या मोठ्या झाडावर वीज पडली. ही वीज पडल्यामुळे ते झाड कोसळले. झाड टिनाच्या शेडवर कोसळल्यामुळे टीनाखाली असलेले शेकडो भाविक हे त्याखाली दबले गेले. या घटनेमध्ये जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण हे जखमी झालेले आहेत. या सर्व जखमींवर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.
अब्दुल सत्तार यांनी रुग्णांसोबत संवाद साधला : या घटनेची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मिळाल्यानंतर राज्याचे प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला दौरा काढला. यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच पारस येथील घटनेमधील रुग्णांचीही त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन भेट घेतली. बाळापूर तालुक्यातील पारस येथे रविवारी रात्री बाबा महाराज संस्थानमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधला. तसेच त्यांना राज्य शासनाकडून हवी ती मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही दिले.
शासनाकडून हवी ती मदत मिळणार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांसोबत कृषिमंत्री सत्तार यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना शासनाकडून हवी ती मदत उपचारासाठी देण्यात येणार आहेत. शासनाकडून रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महसूल अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच शिंदे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.
हेही वाचा : गिरीश चौधरी यांना उच्च न्यायालयाचा पुन्हा झटका, एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन नाहीच