अकोला - सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी आपल्या कामाचे सादरीकरण नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम निवडले आहे. त्यांनी नेटिझन्सच्या मनात घर केले आहे. राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे युट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या प्रत्येक युट्युबवरील व्हिडिओला लाखो चाहते लाईक्स करतात. युट्युबवर प्रसिद्ध झालेले पालकमंत्री बच्चू कडू यांचा यूट्यूबने सिल्वर प्लेट व एक प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
राज्यातील पहिलेच नेते -
युट्युबचे दोन प्रतिनिधी हे प्रशस्तीपत्र घेऊन अकोल्यात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात हा सन्मान करण्यात आला. राजकीय क्षेत्रातील ते राज्यांमधील पहिलेच नेते आहेत, ज्यांना युट्युबने अशा प्रकारे सन्मानित केले आहे. सोशल मीडिया हे घराघरात पोहोचण्याचे उत्तम साधन झाले आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, उद्योगपती व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे नाव कमविलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंब केला आहे. त्या माध्यमातून ते लाखो नेटिझन्सपर्यंत पोहोचतात. प्रत्येक क्षणात ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक कॉमेंट्सला, व्हिडिओला, फोटोला नेटिझन्स प्रतिक्रिया देत असतात. अशाच प्रकारे राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू हे युट्युबवर सक्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक्स केले आहे. तसेच प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांच्या युट्युबवर 10 लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे युट्युबने त्यांना सिल्वर प्लेट आणि एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
हेही वाचा - कॉंग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली, तर मुख्यमंत्रीही होईन - नाना पटोले
पालकमंत्री बच्चू कडू यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपल्यानंतर त्यांनी सिल्वर प्लेट आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीमध्ये युट्युबने पालकमंत्री कडू यांचा सन्मान केला. पालकमंत्री बच्चू कडू यांनी या सन्मानाचे श्रेय त्यांचे सोशल मीडिया चालविणार्या सदस्याला, लाखो चाहते व प्रतिक्रिया देणाऱ्यांना दिले आहे.