अकोला - जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने आज दुपारी जोरदार हजेरी लावली. यामुळे आंबा, कांदा, गहू, भुईमुगाचे नुकसान झाले आहे. त्याचबोरबर पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. तोताराम नवलकार, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - अकोला : कडक संचारबंदीच्या आदेशानंतर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
हवामान विभागाने 7 ते 10 मे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला होता. पातुर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये दुपारी सोसाट्याचा वारा सुटला. सोबत जोरजोरात विजांचा कडकडाट व्हायला लागला. तसेच, पावसानेही हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडला. या पावसामुळे काढलेला कांदा ओला झाल्याची शक्यता असून काढलेली भुईमूगही भिजला आहे.
शेतात गेलेल्या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू
आलेगाव परिसरात बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या तोताराम अमृता नवलकार (वय 65) यांचा वीज पडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला.
अवघ्या काही मिनिटांच्या या वादळी वार्याच्या थैमानाने शेतकऱ्यांचे आंबा, कांदा, गहू व भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान केले. प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला. खरिपाची पेरणी तोंडावर आलेली आहे. या सर्व नुकसानीचे सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - खदान पोलिसांनी पाच आरोपींकडून सात दुचाकी केल्या जप्त