अकोला - भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला येथे येणार आहेत. त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप आज दुपारी अचानक हवेत उडाल्याने कार्यकर्त्यांची धांदल उडाली. दरम्यान, हा मंडप उभा करण्यासाठी एकच धावपळ सुरू आहे.
भाजपचे उमेदवार धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आली होती. सभा दुपारी तीन वाजता सुरू होणार होती. परंतु, या सभेच्या दोन तास आधीच उभारण्यात आलेला सभामंडपाच्या काही भागातील मंडप उडून गेल्याने गोंधळ उडाला. जोरदार हवेमुळे हा मंडप उडाला. आता हा मंडप उभारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मंडप कंत्राटदारांचे कर्मचारी मंडप उभा करण्यासाठी धावपळ करीत असून काही भाजपचे कार्यकर्तेही त्यांना मदत करीत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सभा स्थळाची पाहणी करीत संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात राहण्याच्या सूचना ही पोलीस निरीक्षकांना केल्या आहेत. दरम्यान, सभास्थळी अद्यापही कुठलीच व्यवस्था सुरळीत नसल्याने येथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे.