अकोला - उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत अकोला पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा भाजपमध्ये स्वगृही गेलेले नारायणराव गव्हानकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक पक्षात बंडाळी पहायला मिळाली.
हेही वाचा -युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक'
त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रहमान खान हे एमआयएम, भाजपचे डॉ. अशोक ओळंबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत तिकीट मिळवण्यासाठी अकोल्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रहमान खान यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्यांचे नाव यादीतून कापल्यानंतर त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी करत बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा -खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
काँग्रेसचे प्रदेश महासचिव त्यासोबतच माजी महापौर मदन भरगड यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत अकोला पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेतून उमेदवारी अर्ज मिळेल म्हणून लोक जागरण मंचाचे अनिल गावंडे यांनी आकोट विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी केली. परंतु, हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने त्यांनी बंडखोरी करत लोकजागर मंचच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच मूर्तिजापूर मतदारसंघात शिवसेनेशी बंडखोरी करत माजी जिल्हा परिषद सद्स्य महादेवराव गवळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच भाजपमधून राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून अर्ज दाखल केला. भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक कळंबे यांनी अकोला पश्चिममधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मिळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, त्यांना तिथे एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावर काँग्रेसचे प्रकाश तायडे यांनी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नावावर आमदार बळीराम शिरस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, या दोघांकडेही पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी ही दोन्ही उमेदवार आपले अर्ज मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे.