अकोला - राज्य शासनाने दोन दिवसाआधी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. अकोला रेड झोनमध्ये असल्याने 4 व 5 मे हे दोन दिवस वैद्यकीय प्रतिष्ठाने वगळता संपूर्ण प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढत ग्रामीण भागात मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून (६ मे) मद्यविक्री सायंकाळी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहे.
ग्रामीण भागात व शहरी भागात (अकोला महानगरपालिका क्षेत्र वगळून) नगरपरिषद हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने सुरू करता येतील. मद्यविक्री करणाऱ्या दुकानासमोर पाचपेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक सहा फुटांवर वर्तुळ आखून घ्यावे. संबधित दुकानदाराने सर्व नोकर व ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी. तसेच ज्या नोकरास किंवा ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यांसारखी लक्षणे आहेत, अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये. दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहील, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
किरकोळ विदेशी मद्यविक्रीची दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. किरकोळ देशी मद्यविक्रीची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.