अकोला- जिल्हा परिषदेची निवडणूक ७ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीवर अकोट तालुक्यातील खेर्डा या गावातील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. विकास नाही तर मतदान नाही, असा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत खेर्डा ग्रामस्थांशी 'ईटीव्ही भारत' च्या प्रतिनिधीने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहे.
अकोट शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेर्डा गट ग्रामपंचायतीमध्ये अद्याप विकास झालेला नाही. १५० लोकवस्ती असलेल्या या गावात लोकप्रतिनिधी फिरकतही नाही. त्यामुळे या गावाचा विकास खुंटला आहे. गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, अंगणवाडी व शाळा अशा पायाभूत सुविधा नसल्यामुळे येथील ग्रामस्थ विकासापासून फार लांब राहिले आहेत. गावाच्या जवळच असलेल्या इतर गावांमध्ये '८४ खेडी पाणी पुरवठा' योजनेतून पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावाला ही योजना करंटी ठरली आहे.
गावात असलेले ३ हातपंप हे बराच वेळ बंद पडता. या हातपंपातून गढूळ पाणी येते. त्यामुळे, येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्यांमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर ग्रामस्थांकडून बहिष्कार टाकण्यात येणार असून यासंदर्भात त्यांनी नुकतेच जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या बहिष्काराबाबत गावातील प्रवीण बहिरे, भिमराज भदे, रामेश्वर मानकर, संजय पिंजरकर, मयुरी मानकर, सुजाता भदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : जिल्हा पुरवठा विभागाकडून कांदा व्यावसायिकांच्या गोदामांची पाहणी