अकोला - अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या ठिकाणी शेतातील कोरड्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हे दोघेही इंधन गोळा करण्यासाठी ३० मे'ला सकाळी घरातून निघाले होते. समाधान वारुळे आणि बेबीताई वारुळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
वारुळे पती-पत्नी इंधन आणण्याकरिता ३० मे'ला सकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.
वारुळे पती-पत्नी मूळ कालवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, ते महागाव येथे राहत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि हाताला काम नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने पोलीस पथक रवाना केले. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.