अकोला - शहरातील विविध विकास कामांच्या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या समक्ष ठिय्या आंदोलन केले. ताबडतोब विकासकामांच्या थांबलेल्या फाईल निकाली काढण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी नगरसेवक व नगरसेविका जमिनीवर बसलेले होते, तर ज्या-ज्या विभागाचे अधिकारी फाईल घेवून आले होते, ते मात्र खुर्चीवर बसून होते.
बंद असलेले आणि प्रस्तवित असलेले पथदिवे, गुलजार पुरा येथील दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेतील गुंठेवारीची घरे मंजूर करण्यात यावी, झोपडपट्टीतील घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात यावे, शौचालयात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, शशिकांत चोपडे, मंजुषा शेळके, अनिता मिश्रा, योगेश गीते, अश्विन नवले यांचा समावेश होता.