अकोला - श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी अकोल्यात कावड महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याआधी रविवारी कावडधारी कावड तयार करतात आणि गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जातात. यावर्षीही कावडधारी कावड घेऊन पूर्णा नदीवर निघाले आहेत. यानंतर ही कावड खांद्यावर घेऊन पायी चालत सोमवारी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करतील.
श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या श्रावण सोमवारी साजरा होणाऱ्या शहरातील कावड महोत्सवाला महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून हा महोत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. शहरातील प्रत्येक नगरातून लहान-मोठ्या कावड गांधीग्राम येथे जातात. पूर्णा नदीतील पाणी घेऊन हे कावडधारी कावड खांद्यावर घेऊन पायी जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर मंदिरात येतात. मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक करतात. यासोबतच कावड मंडळांची संख्या शेकडोंच्या घरात गेली असून लहान मुलेही आता कावड काढतात.
यावेळी कावड महोत्सवानिमित्त शहरातील जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, देशमुख फाईल, अकोट फाईल, पाचमोरीसह कावड रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यासोबतच रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.
महिलांचीही कावड -
पुरुषांप्रमाणे महिलांनीही कावड काढली आहे. तीन महिला मंडळाची कावड गांधीग्राम येथील पुर्णा नदीकडे पाणी आणण्यासाठी गेली आहे. यानंतर नदीतील पाणी कावडमध्ये भरल्यानंतर या कावडधारी महिला उद्या(सोमवारी) सकाळी अकोल्याकडे रवाना होणार आहे.