अकोला - जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. त्यानुसार राज्यात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा सर्वाधिक आहे. राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात कडू यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कोरोना संक्रमण व उपचार याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर नऊ ऑगस्ट पर्यंत 82.09 टक्के इतका होता. हा दर राज्यात सर्वाधिक आहे. तथापि जिल्ह्यातील मृत्यूदर मात्र 4.1 टक्के इतका आहे, याबद्दल मात्र चिंता व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या चाचण्या, त्यातुन निदर्शनास येणारे रुग्ण याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांकडुन पालकमंत्री यांनी प्रतिसाद जाणुन घेतला.
जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपाचे डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
बच्चू कडू पुढे म्हणाले, आता सणांचे दिवस येत आहेत. त्यामुळे यंत्रणांनी अधिक सर्तक रहावे. त्यासाठी किमान एक आठवडा आधी नियोजनबध्द पुर्वतयारी करा. स्थानिक स्तरावर लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करा. लक्षणे न दिसणाऱ्या मात्र अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरीच अलगीकरणाची सुविधा असल्यास त्यांना घरातच अलगीकरणात राहुन उपचार घेण्याची मुभा द्या. चाचण्या करतांना अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने करा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.