अकोला - जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये असलेल्या सुविधा पाहून, या पेक्षा उधिक उत्तम सुविधा महिला रुग्णांना मिळाव्यात यासाठी निधीची गरज असेल तो उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडूंनी वैधकीय अधिक्षिका डॉ डॉ. आर्थिक कूलवाल यांना दिले. यासोबतच तिथे उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर यांनाही रुग्णालयाच्या सुशोभीकरण आणि उत्तम दर्जाचे बांधकाम करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आदेश त्यांनी दिलेत.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात भेट दिली. या ठिकाणी असलेल्या विविध वार्डाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील असुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुठल्याही ठिकाणी नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशीन्स त्यांना मिळून आल्या नाहीत. त्या सोबतच रुग्ण तपासणी करण्यासाठीच्या खोल्यांमध्ये ही जुन्याच पद्धतीचे साहित्य लावलेले असल्याने त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
खाली असलेल्या जुन्या टाइल्स काढून त्या ठिकाणी नवीन टाईल्स लावण्याच्या सूचना वैद्यकीय अधिक्षिका कूलवाल यांना दिल्या आहेत. त्यासोबतच प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले सूचनाफलक हे जुन्या पद्धतीचे असून रुग्णांना किंवा येणार्या नातेवाईकांना ते सुस्पष्टपणे दिसावेत यासाठी ही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गणोरकर यांना रूग्णालयाच्या सुशोभीकरण आणि सौंदरीकरण्याच्या संदर्भातील उपाय योजनांच्या प्रस्तावांना तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयाच्या विकासासाठी कितीही निधी आवश्यक असेल तो मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
खासगी रुग्णालयापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर हे रुग्णालय बनविण्याचा माझा मानस आहे. हिंदुजा रुग्णालयातील सुविधा या रुग्णालयात महिला रुग्णांना मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. याठिकाणी असलेल्या लहान मुलांच्या वार्डातील आवश्यक यंत्रणेसाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला.