अकोला - राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांनी एक कोटी 94 लाख रुपयांच्या शासन निधीची अफरातफर केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने अकोला पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, नियमानुसार पालकमंत्र्यांवर किंवा कोणत्याही मंत्र्यांवर चौकशी करण्यासाठी राज्यपाल यांची परवानगी लागते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी 21 फेब्रुवारीला अकोला पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने केली होती तक्रार -
अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेने शिफारशीत केलेल्या विकासकामांना डावलून अस्तित्वात नसलेले बोगस कामे स्वतःच्या लेटरहेडवर बनावट कागदपत्र बनवून घेत कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. राज्यपाल यांच्या आदेशान्वये व अकोला न्यायालयाने नोंदवलेले मत विचारात घेता पोलीस अधीक्षक यांनी तातडीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवधन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
![order](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-vba-press-palakmantri-kadu-affence-mh10035_26022022180133_2602f_1645878693_998.jpg)
दरम्यान, या चौकशीमुळे आता राज्य शासनाच्या आणखी एका मंत्र्यावर चौकशी लागल्याने राज्य सरकार विरोधकांच्या निषणावर आले आहे. त्यामुळे वंचितने चौकशीआधीच पालकमंत्री बच्चू कडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.