अकोला - जालियनवाला हत्याकांड या घटनेला 101 वर्ष होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये हे हत्याकांड इंग्रजांनी केले होते. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. त्या ठिकाणी केंद्र सरकार हे आंदोलन चिरडण्यासाठी यासारखेच एखादे हत्याकांड घडवू शकते, अशी भीती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चाही झाली. परंतु अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकार हे जनतेचे माय बाप आहे. जेव्हा एखादे मूल हट्टीपणा करतो, त्यावेळी मायबाप कधीच ताठर भूमिका घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आपली भूमिका बदलून जनतेचे हित जोपासावे, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांनाही एक कोटी द्या -
गुजरात येथील अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला. त्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर केली. परंतु, दिल्लीतील शेतकरी आंदोलनामध्ये 66 शेतकऱ्यांचे बलिदान गेले आहे. त्या शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवित नाहीत. या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांनाही एक कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी शेतकरी जागरचे नेते प्रशांत गावंडे यांनी केली आहे.
हेही वाचा - महानगरपालिका निवडणुकी आधीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार- चंद्रकांत खैरे